Sunday, 30 December 2018

बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन

बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन*
दिवस पहिला
दिनांक 09/05/2018
*गुरुदत्त ट्रॅव्हल चांदा ता नेवासा* यांच्यासोबत एक धाम बद्रीनाथ सोबत केदारनाथ वैष्णोदेवी व इतर ठिकाणी जायचे होते. ट्रॅव्हल्स चे मालक श्री विजय चौधरी हे परिचयाचे होते. त्यांची दोन्ही मुले आमच्याकडे शिकले..16000 ₹ प्रत्येकी जेवण व प्रवासखर्च असे नियोजन होते.
गेले आठ दिवस जावे की न जावे असं चाललेलं त्याच कारण म्हणजे बदली. त्यात शिक्षक म्हटलं की बदलीचा धाक नव्हे टांगती तलवारच. 9 तारखेला निघायचं होत. 7 तारखेला यादी करून प्रवासासाठी लागणारे समान खरेदी केले. 8 तारखेला बॅगा भरल्या.साधारण 20 दिवसाचा प्रवास होता. आम्ही दोघे पती पत्नी जाणार होतो. 1 बॅग घ्यायची असे ठरवूनही 2 मोठ्या व 1 छोटी बॅग भरली.
सकाळी 9 तारखेला बरोबर 9 वा बस घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून निघाली. रस्त्यात प्रवासी घेत नेवासा येथे पावन गणपती मंदिराजवळ बस थांबली. दर्शन घेऊन काही यात्रेकरूंना घेऊन बस 10 वा औरंगाबादकडे निघाली.
रस्त्याने आणखी प्रवासी घेत औरंगाबादला 12.30 वा पोहोचलो. एकूण 46 प्रवासी होते व 9 कर्मचारी होते. हळू हळू इतर प्रवासी मित्राबरोबर ओळखी व्हायला लागल्या. या सर्वात आम्ही दोघेच तरुण म्हणजे 40 व 44 चे होतो बाकी सर्व 60 च्या आसपास वयाचे होते.
2.00 वा आळंद ता अंबड येथे एक मंदिरात जेवण केले. घरून तयार करून आणलेले जेवण होते. एकमेकाला एकमेकांच्या भाज्या देत गप्पा मारत जेवण केले. अन पुढील प्रवासाला बसमध्ये बसलो. अजिंठा आल्यावर थोडे थांबून अजिंठाहुन 3.40 वा निघालो. 4.30 वा पाहुर ता जामनेर येथे पोहोचलो.
5.30
ला उसाचा रस घेतला जामनेर मध्ये पोहोचलो.
6.30
मुक्ताईनगर मध्ये पोहोचलो. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताबाई या चार भावंडात सर्वात लहान मुक्ताबाई यांची येथे समाधी, खरं तर वादळात सापडून त्या गुप्त झाल्या किंवा त्यांनी धरणीप्रवेश केला असावा अशी आख्यायिका आहे.
मुक्ताईदेवी दर्शन दर्शन घेऊन येथेच मुक्काम करायचा असे ठरले होते परंतु दर्शन वेळेत झाल्यामुळे ओंकारेश्वरला मुक्कामाला जायचे ठरले. रस्त्याने खूप खूप केळीच्या बागा दिसल्या. लहानपणी शाळेत असतानाचे गाणे आठवले
"
केळीच्या बागा मामाच्या
पिवळ्या घडांनी वाकायाच्या"
जळगावची केळी का प्रसिद्ध आहे हे तिथे गेल्यावर समजले.
मध्यप्रदेश बॉर्डरवर चेकनाका आहे तिथे केळीवाला आला, त्याच्याकडन केळे घेतली. चवदार केळी खाल्ली.
7.20
मध्यप्रदेश राज्यात प्रवेश केला. पत्नी वैशालीने प्रथमच महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात प्रवेश केला होता. त्याचाही आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
रात्री 8.45 ला एक धाब्यावर थांबून जेवण केले. आयुष्यात प्रथमच बायको वैशाली व मी एकत्र जेवलो चणा भाजी व वरन अन बाजरीची भाकरी खाल्ली.
बुऱ्हाणपूरला रस्त्याने किल्ल्याची भिंत पाहत होतो.
अन तेथून ओंकारेश्वरकडे बस निघाली. गार हवेत बसमध्ये अपॊआप झोप लागली.
*मिलिंद जामदार,*
*
घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर*
*9404342216*




बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन*
दिवस दुसरा
दि 10 मे 2018
आधल्या दिवशी मुक्ताईनगरहून निघून मध्ये एक धाब्यावर जेवण करून 10 मेला मध्यरात्री (सकाळी) 1.45 वा ओंकारेश्वर येथे सुखरूप पोहोचलो. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या धर्मशाळेत मुक्कामाला थांबलो.
पहाटे साडेपाचला उठलो.शेगावचे सेवेकरी तेथे दिसले. स्वच्छता खूप छान होती. सगळा परिसर सुशोभित होता. झाडे मंदिरे आश्रमशाळा सगळं कसं सुंदर होते. फ्रेश होऊन सर्वानी चहा घेतला. चहा घेऊन नर्मदा स्नानासाठी नर्मदा नदीकडे निघालो. अगदी सकाळी गेल्याने पाणी कमी होते. वरच्या बाजूला नर्मदा डॅम असल्याने पाणी वाहते होते. थंड पाण्यात मस्त डुंबलो. सकाळी 7.15 वा नर्मदा स्नान केले. तेथून झुलत्या पुलावरून ओंकारेश्वरांकडे दर्शनासाठी निघालो. झुलत्या पुलावर आल्यावर उजव्या बाजूला नर्मदेचे विशाल रूप व शहराचे दर्शन घडते. गावात शेकडो मंदिराचे कळस दिसत होते. सुर्योदयामुळे शहर पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाले होते. तेथे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फोटोग्राफी करून दर्शन रांगेकडे वळलो.
ओंकारेश्वर दर्शन 7.35 वा घेतले.
महाराष्ट्राबाहेरच हे माझं पहिलच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक दर्शन. तेथे बाहेर आल्यावर नदीचे सौन्दर्य न्याहाळत बसलो. होड्यांची गर्दी त्यांची प्रवाशासाठीची लगबग, मंदिर डोंगरकपारिवर उंचावर आहे. नदीचे अथांग पाणी तेथे दिसत होते. घाटावर अंघोळीची गडबड पाहून पंढरपूरची वाळवंटाची आठवण झाली. सर्वांचे दर्शन होईपर्यंत मी परिसर निरीक्षण करत होतो. हेमाडपंथी पूर्ण दगडात बांधलेले मंदिर पण पत्रे निवाऱ्यासाठी टाकल्याने मंदिराची शोभा गेली होती. जवळून मंदिर दिसत नव्हते, लांबून पाहिल्यावर दिसते. झुलत्या पुलाहून पुन्हा गजानन महाराज महाराज मठाकडे आलो. आईच्या आग्रहास्तव नर्मदेचे पाणी येतांना सोबत घेतले. मठातील मंदीरे फार सुंदर होती. कृष्णाची मूर्ती खुप आवडली. तोपर्यंत जेवण तयार झाले होते. सर्व जण पंगत करून बसलो. 8.30 ला जेवण , शेवगा चपाती वरण भात, लोणचं पोटभर जेवलो. नियोजित प्रवासात उज्जैन नव्हते. परंतु पुढे उज्जैनला जायचे ठरले.
10
वा उज्जैन साठी प्रवास सुरु झाला. उष्णता खुप वाढली होती. खिडकीतून येणारी हवा सुद्धा गरम होती. ऊन जाणवत होते.
12.00
इंदोर मध्ये पोहोचलो. अहिल्याबाई होळकरांची आठवण झाली. महानगरपालिकेने रस्ते सुशोभित केलेले होते. प्रत्येक चौकात छान पुतळे होता. इंदूर शहरातून जाताना खूप छान वाटले. पावणेतीन वाजता उज्जैनला पोहोचलो. तेथे एका आश्रमशाळेत उतरलो. राधाकृष्णाचे मंदिर होते.
3.00
वा आम्ही सर्वानी चहा घेतला. 100 रु प्रतिसीट प्रमाणे उज्जैन दर्शनासाठी रिक्षा (टमटम) केल्या व उज्जैन दर्शनासाठी बाहेर पडलो. तेथे गढकलीका भर्तृहरी गुफा पाहिल्या व नवग्रहांच्या मंदिर पाहून मंगलनाथ, महाकाली मंदिर पाहिले. सांदीपनी ऋषि आश्रम पाहण्यासाठी आलो. याठिकाणी कृष्णाने सुदामा सोबत सांदीपनी ऋषींकडे 14 विद्या, 64 कला, याचे शिक्षण घेतले. आश्रम व पुष्करणी पाहून कालभैरव मंदिराकडे निघालो. रस्त्याने रिक्षावाला अनेक लहान मोठे ठिकाणे दाखवत होता. तेथून कालभैरव मंदिराकडे निघालो. दारू पिणारा देव म्हणून खूप ऐकले होते. वाटत नव्हते देव दारू पित असेल असे. पण समक्ष कालभैरव दारू पिताना पाहिला व इतर देवांचे दर्शन घेतले. रस्त्यात इथून तिथून क्षिप्रा नदी ओलांडत होतो. क्षिप्रा नदी व नदीवरील मनोहारी घाट लक्ष वेधून घेत होते. घाटांची संख्या खूप जास्त आहे. कुंभमेळ्यासाठी नदीवरील घाटाची आवश्यकता असते. याठिकाणी सिहस्थ कुंभमेळा असल्याने रस्ते व इतर सुविधा भरपूर आहेत. नंतर समजले 50 रु बसमध्ये उज्जैन शहर व मंदिराचे दर्शन घडवतात. घाटांची बांधकाम वेगळ्या पद्धतीचे वाटले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैनचे
महाकालेश्वर दर्शन घेण्यासाठी निघालो. इथे कॅमेरा मोबाईल आत नेऊ देत नाही. इथली चप्पल सुविधा छान होती. दाराहन रांगेत बराच वेळ चप्पल घालून जाता येते. शेवटी चप्पलस्टँड आहे. येथे चप्पल ठेवली की मंदिराचा बाहेर मिळते. तशी चैनची व्यवस्था आहे.
दर्शन लांबूनच होते पण चांगल्या पद्धतीने जवळून मूर्ती व्यवस्थित दिसत नाही. म्हणून मूर्ती पाहताना दर्शनरांगेत वरच्या मजल्याहून दिसते तिथुनच पहावी व जवळ जाऊन हात जोडावे. महाकालेश्वर दर्शन सायंकाळी 6 वा घेतले इतर मंदिरे पहात पुढे निघालो.
पुढे आल्यावर खूप मोठी मूर्ती लक्ष वेधून घेते. राजा विक्रमादित्य. त्याच्या दरबारातील नवरत्ने व सिहासन तिथे आहे. मुर्त्या खूप आकर्षक बनवल्या आहेत. सिहासंनाचा दगड तिथे आहे. विक्रमादित्याचा काळातील सिहासनाच्या दगडाचा काही भाग तेथे आहे. येथे छान सुशोभीकरण केले आहे.
फोटोग्राफी करून आश्रमशाळेकडे निघालो. तोपर्यन्त स्वयंपाक झालेला होता.
रात्री 7 वा जेवण केले. कृष्ण मंदिरात सायंकाळची आरती होती , आरती करतांना मन प्रसन्न झाले. 8 वा आग्र्याकडे प्रवासासाठी निघालो.
प्रवास खूप लांबचा होता. रात्रभर प्रवास करायचा होता. शाजापूर मुक्काम करायचा होता परन्तु मुक्कामाची हवी तशी व्यवस्था नसल्याने परत निघालो. पण गाडी बिघडली
रिव्हर्स गियर पडत नव्हता
ड्रायव्हरने दुरुस्त केली व रात्रभर प्रवास सुरु होता....
*मिलिंद जामदार*
*
घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर*
9404342216
 









बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन*
दिवस तिसरा
11 मे 2018
रात्रभर प्रवास चालू होता.सकाळी 
6
वा रस्त्यात दद्दु धाब्यावर थांबलो. आणखी बराच प्रवास करायचा होता. धाब्यावर फ्रेश होऊन अंघोळी केल्या. चहा बिस्कीट घेऊन पुढे आग्रा प्रवासासाठी निघालो. प्रवास मध्यप्रदेशात चालू होता. बरेच मोठे जंगल लागले. पण झडलेली असल्याने उजाड वाटत होतं. जंगल संपल्यावर शिवपुरी मध्यप्रदेश येथे एक पेट्रोल पंपावर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत थांबलो. आज एकादशी उपवास असल्याने शाबुदाना खिचडी करणार होते
सर्वांना जेवणासाठी खिचडी काकडी बेत होता. जेवण करून सर्वजण निघाले. ऊन खूपच जास्त जाणवत होते.दुपारी 12 च्या दरम्यान ग्वाल्हेर शहराजवळ आलो . लांबूनच 12.15 वा ग्वाल्हेरचा किल्ला पाहिला. शहाराबाहेरून बायपासने बाहेर निघालो. रस्ता बऱ्यापैकी खराब झालेला होता.
दुपारी 3.00 वा चंबळ नदीचे खोरे पाहिले. छोट्या मातीच्या टेकड्या, त्यावर झुडपे, वाऱ्याने उडणारी माती, धूळ अन चंबळ नदी पहायला वेगळंच वाटत होतं. या टेकड्यातच मध्यप्रदेश व राजस्थान बॉर्डरवर रस्त्याच्या कडेला शेरगढ किला धौरपूर येथे पाहिला. किल्ला बसमधून पाहिला. किल्ला बराच मोठा होता. या मातीच्या टेकड्यावर एवढा मोठा दगडात बांधलेला किल्ला पाहून असं वाटलं की त्या काळातील बांधकाम जबरदस्त. राजस्थान राज्यात प्रवेश केला. आग्र्याकडे जाणारा रस्ता राजस्थानमधून जात होता, फक्त 28 किमी. साठी जायचे होते.
पुन्हा उत्तरप्रदेशात प्रवेश करून सायंकाळी 5.00 वा आग्राला पोहोचलो. नेहमीप्रमाणे एक शॉपिंग सेंटर पाहिले. रात्री हॉटेल राजदीप पेयिंग गेस्ट हॉटेलवर थांबलो. मस्त चहा घेतला फ्रेश झालो. आराम केला. रात्रीच्या जेवणात शेंगदाणे पिठलं बाजरी भाकर व भगरीचा भात होता. जेवण करून मस्त झोप घेतळू कारण कल रात्रभर प्रवास केला होता. उद्या सकाळी लवकर उठायचे होते कारण ताजमहाल 6 वा सुरू होणार होता. उन्हाच्या आत पहायचा होता. ताजमहाल विचार करत झोपलो.
*मिलिंद जामदार*
घोडेगाव ता. नेवासा, जि. अहमदनगर





बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन*
दिवस चौथा
दि 12 मे 2018
हॉटेल मधल्या रुम असल्याने सकाळी साडेचारला उठून अंघोळ करून लवकर आवरले व बाहेर येऊन थांबलो. थोड्या वेळातच चहा व बिस्कीट नाष्टा केला. ताजमहाल पाहण्याची उत्कंठा होती. आवरून पटकन बस मध्ये बसलो. गाईड सोबत होता हे घ्या ते घ्या चाललं होतं. बळेच एक दुकानात आग्र्याच्या पेठा घेतला.
तेथून ताजमहालकडे ताजमहाल पाहायला निघालो. याठिकाणी पार्किंग मध्ये गाडी लावून तेथील मिनीबसने प्रवास करावा, रिक्षाने जाऊ नये कारण रिक्षावाले जास्त पैसे घेऊन अलीकडे सोडतात व बरेच अंतर पायी जावे लागते तर बस ताजमहालच्या गेटपर्यंत सोडतात. बस बॅटरीवर चालणाऱ्या आहेत.
10
रुचे शूज कव्हर घेतले त्यामुळे चप्पल किंवा शूज कोठेही काढावे लागत नाही. चेकिंग करून आत सोडतात शक्यतो मोबाईल, पाण्याची बाटली व कॅमेरा सोडून सोबत काहीही घेवू नये. कारण ते सर्व काढून घेतले जाते.ताजमहाल मध्ये चेक आऊट करून आत आलो, हिरवळीने थोडं मनाला शांत वाटलं. लाल दगडात बांधलेले प्रवेशद्वार त्यातून आत प्रवेश वेगळच वाटत होतं. गेटवर फोटोग्राफरची गर्दी, त्यातला एक निवडला कारण त्याने फारच आग्रह केला. कदाचित त्याच्या आग्रहाला बळी पडलो 2 फोटोच्या बोलीवर 50 फोटो काढले. त्याच्याकडून 500 रु त 50 फोटो सॉफ्टकॉपी घेतले.
मोबाईल मध्ये खूप फोटो काढले.
माझी मुलगी दियाला व्हीडिओ कॉल करून ताजमहाल दाखवला. मनात विचार आला कबरीसाठी हे लोक इतका पैसे खर्च करत होते अन त्याच वेळेस शिवाजी महाराज स्वराज्य स्थापने साठी किल्ले उभारत होते. बाहेर आल्यावर खूप शॉपिंग केले भरपूर बार्गनिंग करून भरपूर खरेदी केली. बॅटरीवर चालणाऱ्या बसने पार्किंगला आलो. तेथे पोह्यांचा नाश्ता वाट पाहत होता.
9
वा पार्किंगमध्ये पोहे खाऊन आग्र्याच्या किल्ल्याकडे निघालो.
निघालो.
आग्र्याच्या किल्ल्याजवळ जाताना शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहून अभिमान वाटला. गाडी पार्क केली. ऊन प्रचंड वाढलं होत. एन्ट्री तिकीट काढून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. येथूनच शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. कदाचित त्यांचे पाऊल याठिकाणी पडले असेल असे मनात आले व तेथे नतमस्तक झालो. किल्ल्यात प्रवेश केला. गाईड घेतला, तो माहिती देत होता. शहाजहान राजाला राजस्थानहून सोन्याचा बाथटब दिला होता. तेथून पुढे औरंगजेबाच्या दोन मुलींचे महाल झिनतउंनीसा व झेबूनीसा यांचे महाल व शहाजहान व इतरांचे शयनकक्ष पाहिले. अंगुरी बाग पाहून दिवाण ए खास पहिला. तेथे शहाजहान बादशहाची पोर्तुगालहुन आणलेले सिहासंन पाहिले. या दगडावर सोने घासून त्याची परीक्षा घेतली जाते त्या दगडापासून बनवलेलं ते सिहासंन . मंत्री व इतरांचे महाल पाहून दिवाण ए आम पहिला. जेथे शिवरायांनी बादशहाचा अपमान केला. त्या महालाची रचना छान होती. जेथे औरंगजेब बसायचा त्या ठिकाणाहून संपूर्ण दरबार व हत्ती दरवाजा दिसेल अशी रचना होती. त्या हत्ती दरवाजातून जर बादशहाला कुर्निसात केला नाही तर तेथे त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवले जाई.
शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी ठेवले ते ठिकाण सध्या बंद आहे, काम चालू आहे असे सांगतात. तिकडे जाऊ देत नाही. तिथूनच महाराजां वंदन केले. हत्ती दरवाजाने बाहेर पडलो. उन्हाचा त्रास जास्त झाला.
बसकडे आलो . तेथून आता मथुरेच्या प्रवासाला निघायचे होते.
मथुरेच्या प्रवासाला निघालो.
दीड वा मथुरेत पोहोचलो, उन्हामुळे आजारी पडलो, थंडीताप आली.गोळ्या घेऊन झोपलो, नंतर बर वाटलं,
जेवण छान होते वरण भात, कोबी, वांगे, मठ्ठा,व चपाती
मी वरणभात खाल्ला. थोडा आराम केला.
मथुरेत फिरायला गेलो. पार्किंग पासून बरेच लांब चालत जावे लागले. आत प्रवेशासाठी फारच कडक तपासणी होती. कोणत्याही प्रकारची बॅग आत नेऊ देत नाही. मथुरेत कृष्ण जन्म ठिकाण व मंदिर पाहिलं. कृष्ण जन्म ठिकाणच्या वरती मस्जिद बांधलीय. मुस्लिम राजवटीत बऱ्याच देवस्थानचा छळ झाला. रामाबरोबर कृष्णही यातून सुटलेला नाही. मंदिर सुंदर होते.
तेथून वृंदावनला निघालो
वृंदावनला पोहोचल्यावर उतरताना मला चक्कर आली. आग्र्याच्या किल्ल्यातील उन्हामुळे मला त्रास झाला होता. प्रेम मंदिर बस मधून पाहिलं होतं, आकर्षक रोषणाई केली होती. मी पार्किंग मधेच आराम केला.
पुन्हा परतीचा प्रवास सुरु झाला. वृंदावन मधील मंदिरे बसमधून पाहत होतो. गर्दी खप जास्त होती. उशीर झाल्याने सर्व मंदिरे पाहता आली नाही. मनात ठरवलं की एक पूर्ण दिवस वृंदावनला द्यायचा.
मथुरेत पोहोचलो. अन जेवण न करता झोपलो.
*मिलिंद जामदार*
घोडेगाव ता.नेवासा, जि अहमदनगर
9404342216
 
बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन*
13
मे 2018
*दिवस पाचवा*
*मथुरा*
आज मथुरेत सकाळी साडेचारलाच जाग आली.
अंघोळ लवकर केली. आज चहा बिस्कीटचा नाश्ता होता. तेथून बसने गोकुळात आलो. तेथे ब्रम्हांड घाटावर आलो. घाटावर कुनी अंघोळ करत होते तर कुणी पाय धुवून मंदिराकडे चालले. मी ही हात पाय धुवून दर्शन घेतले. येथे महावन होते. कृष्णाचे बालपण याच परिसरात गेले.
याच ठिकाणी कृष्णाने माती खाऊन यशोदा मातेला तोंडात ब्रम्हांड दाखवले. म्हणून या मंदिराला ब्रम्हांड मंदिर म्हणतात. येथे कृष्णाने माती खाल्ली होती. त्याच मातीचे लाडू प्रसाद म्हणून येथे विकतात.
पुढे आल्यावर कदंबवृक्ष लागला. याच ठिकाणी महावनात गोपिका पाणी आणणे व अंघोळीसाठी येत, येथेच गोपींच्या साड्या घेऊन या कदंब वृक्षावर कृष्ण बासरी वाजवत बसायचा. येथे त्या कदंब वृक्षाचे दर्शन घेतले. तेथे झाडाला कापड बांधतात. त्यामुळे त्या झाडाची शोभा गेली. मंदिरे कृष्णाची अन तिकडे लोक *राधे राधे* म्हणतात.
मथुरेतून कंसाच्या तावडीतून वाचवून कृष्णाला गोकुळात ज्या ठिकाणी सोडले तेथे गेलो. जुने गोकुळ त्यालाच महावन म्हणतात. येथे 84 खांबाचे मंदिर आहे.
गोकुळात जेथे कृष्ण वाढला तेथे कृष्णाच्या मूर्तीसमोरील पडदा काढण्यासाठी तेथील ब्राम्हण पैसे घेतात. छान भाषण देऊन 5000 पासून 5 रु पर्यंत अक्षरशः लुटतात. काही जण तर अगदी ओढून रस्त्यातील मंदिरात ओढून नेतात, तेथे पैसे नाही टाकले तर ओरडतात. सध्या फक्त ब्राम्हण लोक लुटालूट करतात. हे पाहून वाईट वाटलं. येथे शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. तेथून पुढे बसमध्ये बसून रमनरेतीला आलो.
*रमनरेती*
येथे प्रवेश केल्यावर सगळीकडे समुद्रातील रेतीसारखी याठिकाणी रेती दिसते. कृष्ण या रेतीत खेळला म्हणून यास रमनरेती म्हणतात. याठिकाणी रेतीत नाचतात व कृष्ण या रेतीत खेळला म्हणून लोक येथे मातीत लोळतात. कृष्ण मंदिरात भजनाच्या तालावर अपॊआप पाय उड्या मारायला लागतात. बरेच जण नाचत होते तर कोणी फुगड्या खेळत होत. राधा कृष्णाची प्रेमगिते (भजने) खूप सुंदर होती. टाळ, झान्ज, ढोलकी व टाळाच्या आवाजात मन मोहून जात होतं. राधा कृष्णाची मंदिरे व मूर्ती फार सुंदर आहेत. येथे बराच मोठा आश्रम आहे. बांबूच्या झोपड्या छान आहेत. बाहेर आल्यावर येथे फक्त हरणांचे प्राणी संग्रहालय आहे. हरणांना चारा खाऊ घालून थोडेसे थंड घेऊन पुढील मथुरेला भक्त निवासाकडे निघालो. तेथे बासुंदी बेत होता. बासुंदी खाऊन म्हणजे जेवण करून निघालो.
नियोजनानुसार दिल्लीला जायचे होते. परन्तु दिल्ली व परिसरात वादळ आले होते. प्रवासात काही प्रमाणात ते जाणवत होते.
1.30 वा अलिगढ उत्तरप्रदेशातील मोठे शहर लागले. येथे अलिगढ विद्यापीठ आहे. या शहरातून पुढे प्रवास चालू केला.
2.45
बुलंद शहरात पोहोचलो. रस्त्याने दुतर्फा आंब्याच्या बागा होत्या. खूप मोठी आंब्याची झाडे होती. कोकणात नाही एवढी मोठं मोठी झाडे होती. रस्त्याच्या कडेला झाडे असून झाडावर फळे असतांना कोणी राखणदार दिसला नाही. आपल्याकडे उसाची शेती तशी तिकडे आंब्याची शेती.
4.30 ला मेरठ उत्तरप्रदेश मोठे शहर प्रवासादरम्यान लागले. येथून पुढिल प्रवासात धुळीचे वादळ लागले. पाऊसही सुरू झाला होता. एकदोन मोठे रस्त्यात झाडे पडले होते
त्यामुळे 3 तास ट्रॅफिक जाम झाले. त्याच वेळेत गाडी बाजूला करून थांबलो. पावसात एक छोट्या शेडमध्ये मसालेभात स्वयंपाक केला. मसालेभात खाल्ला. गाडीत बसलो. याच कालावधीत रस्त्यात एक झाड अंगावर पडून एका प्रवाश्याचा मृत्यू झाला.
येथून पुढे बराच वेळ प्रवास करायचा होता. हरिद्वारला पोहचायचे होते.
श्री विजय चौधरी यात्रा आयोजक यांनी प्रवासात बदल करण्याचे ठरवले, ते आमच्या प्रवासात पुढे खूप फायद्याचे ठरते. दिल्ली व उत्तरेकडे वादळ असल्याने प्रवासात बदल केला होता.
गाडीत छान झोपलो व प्रवास सुरु

हरिद्वारकडे.........
*मिलिंद जामदार*
*
घोडेगाव ता. नेवासा, जि. अहमदनगर*
9404342216

No comments:

Post a Comment